Tuesday, June 22, 2010

मराठी Literature

कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना

भालचंद्र नेमाड्यांची १९६३मध्ये प्रकाशित झालेली 'कोसला' ही मराठीतली अतिशय गाजलेली कादंबरी. नेमाड्यांनी त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी, कथानायक ‘आज उदाहरणार्थ पंचविशीचा’ आहे असे सांगून लिहिलेली ही कादंबरी पंचेचाळीस वर्षे झाली तरी आपला प्रभाव टिकवून आहे. मूलपण आणि प्रौढ पुरुष यांच्यामधली गोंधळलेली अवस्था, जगाच्या भंपकपणाचा येणारा राग, स्वत:च्या डोक्यातला विचारांचा 'कल्लोळ कल्लोळ', पुढे नक्की काय करायचे आहे याचा काहीच निर्णय होत नसल्याने येणारी अस्वस्थता, आणि अशातच शरीराच्या गरजांचे वाढत्या उत्कटतेने जाणवू लागणारे अस्तित्व या सार्‍यांचा कोलाज कोसलाने मराठीत प्रथमच मांडला. ज्ञानेश्वरीतही वापरल्या गेलेल्या कोसला ह्या खानदेशी शब्दाचे मूळ म्हणजे ‘कोश’. वेगळेपणा, अलम दुनियेपासून तुटलेपण ह्या रुढ अर्थाबरोबरच एकमेकांत गुंतलेल्या वेगवेगळ्या धाग्यांनी तयार झालेले क्लिष्ट, काहीसे संरक्षक असे जाळे असाही ह्या रुपकाचा अर्थ नेमाड्यांना अभिप्रेत असावा.

फडके-खांडेकरांच्या प्रभावांपासून नुकतेच मोकळे होऊ लागलेल्या, स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास स्वीकार करण्याच्या मनःस्थितीत येऊ लागलेल्या मराठी वाचकवर्गाने अशा या वेगळ्या वाटेवरच्या पुस्तकाला डोक्यावर घेतले नसते, तरच नवल. आजही आकाशवाणीने वाचकांकडून मागवलेली मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी असो, वा अंतर्नादची सर्वोत्तम २० पुस्तकांची यादी - कोसलाचा त्यात समावेश असतोच. साठोत्तर साहित्यातील मराठीतील सर्वात महत्त्वाची म्हणता येईल अशी ही कादंबरी, इंग्रजीतल्या जे. डी. सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीवर बेतलेली आहे/ तिच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहे, असा प्रवाद जेव्हा प्रथम ऐकला; तेव्हा काहीसे आश्चर्यच वाटले.

त्याची शहानिशा करावी या हेतूने या दोन्ही कादंबर्‍या एकापाठोपाठ एक वाचल्या. या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे, आणि फरकही जाणवले. ते लिहिण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, हा सारा उपद्व्याप ‘कोसला’सारखी लोकप्रिय कादंबरी कशी परप्रकाशित किंवा कमअस्सल आहे, हे सांगण्याच्या अभिनिवेशातून केलेला नाही. कोसलाने अनेकांना झपाटून टाकले आहे. तिची वेगळी शैली, ओळखीचे वाटणारे अनुभव आणि त्या वयातली अचूक टिपलेली मानसिकता - यामुळे ती केवळ तीस-चाळीस वर्षांपूर्वी पंचविशीत असणार्‍या पिढीला जवळची न वाटता, आजच्या पिढीलाही ओळखीची वाटते. त्यामुळे मूर्तिभंजकाचा आव आणून, जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ, अशा सवंग अट्टाहासातून हे लेखन केलेले नाही.

दुसरे म्हणजे, तसे पाहिले तर साहित्यात फार थोड्या गोष्टी, फार थोड्या थीम्ज ह्या ओरिजिनल, मूळच्या आहेत.‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ या न्यायाने कुठलाही विषय आत्तापर्यंत अस्पर्श राहिला असेल, असे वाटत नाही. तेव्हा या मूळ कल्पनांमध्ये लेखकाने स्वत:ची शैली कितपत जाणवून दिली आहे, स्वतःच्या प्रतिभेची कितपत गुंतवणूक केली आहे हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे, कोसला आणि कॅचरचा नायक हा कॉलेज सोडलेला, सारख्याच पराभूत मानसिकतेत सापडलेला आहे; या साम्यापेक्षा त्यांच्या शैलीतील साम्य (आणि अर्थातच फरकही) मला अधिक महत्त्वाचा वाटतो. अर्थात, ‘कादंबरी उत्कृष्ट आहे ना? झालं तर! मग तिची प्रेरणा कुठूनही का असेना’, या विधानाला काही प्रतिवाद नाही; कारण कादंबरीच्या आस्वादात तिच्या प्रेरणास्रोताच्या स्थानामुळे काही बाधा येत नाही हे नक्की.

या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे दाखवायची झाली तर, दोहोंतला सुरुवातीचा परिच्छेदच पुरेसा बोलका आहे. ‘बट आय डोन्ट फील लाईक गोईंग इंटू इट…आय ऍम नॉट गोइंग टू टेल यू माय होल गॉडडॅम ऑटोबायोग्राफी’, या मंगलाचरणाने सुरुवात करणारा होल्डन आणि ‘खरं तर तुम्हांला वगैरे सांगण्यासारखं एवढंच...पण मी अगदी सगळंच सांगणार नाही’ म्हणणारा पांडुरंग सांगवीकर.‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ हे दोघांचेही ध्रुवपद.

दोघांचेही वडील कर्तबगार; पांडुरंगाच्या शब्दांत सांगायचे तर ‘रंगारूपाने प्रतिष्ठित’. एकाचे वडील सधन शेतकरी, तर दुसर्‍याचे चांगली कमाई असणारे वकील. त्यामुळेच की काय, पण पैशाच्या बाबत दोघेही अगदी उधळे नसले तरी काहीसे बेफिकीर. गॅदरिंगच्या बजेटबाहेर गेलेल्या खर्चाचे प्रकरण ‘कोसला’मध्ये येते; तर टाईपरायटर स्वस्तात विकून पैसे घेण्याची, अगदी लहान बहिणीने ख्रिसमससाठी साठवलेल्या पैशांतून उधार घेण्याची पाळी कॅचरमध्ये होल्डनवर येते. मेसच्या हिशोबात पांडुरंग फसवला जातो, तर होल्डनला वेश्या आणि तिचा दलाल ठकवतात. असे झाल्यावर ‘आपण कोणतंच काही नीट केलं नाही’ ही (पांडुरंगच्या शब्दांतील) भावना आणि असे फसवले गेल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटणे - हेही दोन्हीकडे सारखेच. पांडुरंग मेस, गॅदरिंग इ. मध्ये निष्काळजीपणे अडकतो; तर होल्डन कॉलेजच्या फेन्सिंग टीमचा मॅनेजर बनतो खरा - पण त्यांचे सामान ट्रेनमध्ये विसरून परत येतो. ह्या स्वभावदोषावर (किंवा वैशिष्ट्यावर) ‘कोसला’त थोडीफार टिप्पणी येते, पण होल्डन मात्र ‘सम गाईज स्पेन्ड डेज लूकिंग फॉर समथिंग दे लॉस्ट. आय नेव्हर सीम टू हॅव एनीथिंग; दॅट इफ आय लॉस्ट, आय वुड केअर टू मच’ असे परिणामकारक भाष्य करून जातो.

दोन्ही नायकांच्या आयुष्यांत त्यांच्या धाकट्या भावंडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ऍलीचा आणि मनीचा, लहान वयात झालेला मृत्यू दोघांना उद्ध्वस्त करून जातो. मृत्यूच्या या अन्यायाने संतापून जाऊन होल्डन रात्रभर गॅरेजमध्येच झोपतो. आपल्या हाताने तिथल्या खिडक्या फोडतो, गाडीच्या काचाही फोडण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंग ‘मी याचा सूड उगवीन’ अशा प्रतिज्ञा करून लहान मुलींची पिवळी साडी चिंध्या करून पेटवून देतो. त्या जाळात हात भाजल्यावर, शाईने तळवे थंड करून खोलीभर त्याचे शिक्के उमटवतो. इतर जगाला समजून घेताना त्रास होत असला, तरी मनीशी आणि फीबीशी त्यांचा संवाद जुळतो.

दांभिकतेबद्दलचा दोघांचाही उपहास एकाच जातकुळीतला. होल्डनला त्यांच्या शाळेतल्या चर्चमध्ये येऊन भाषण देणार्‍या उद्योगपतीबद्दल वाटणारा आणि पांडुरंगाला वक्तृत्वमंडळात जाणवलेला. इतिहासाबद्दल दोघांच्या प्रतिक्रिया सारख्याच. ‘साल्यांना शिलालेख सापडले वगैरे, म्हणून अशोकाची माहिती कळली. मधले कुठले पुरावे नसले, की हे लोक वाटेल तसे ठोकताळे बांधतात’ म्हणत पांडुरंग इतिहास सोडून मराठी घेतो. अशाच धर्तीवर इजिप्शियन्सबद्दल लिहून ‘मला एवढंच माहीत आहे, मला नापास केलंत तरी चालेल’ अशी शरणचिठ्ठी उत्तरपत्रिकेतच लिहून होल्डन शाळा सोडतो.

दोन्ही कादंबर्‍यांतील तपशीलांत याहूनही काही अधिक साम्ये आहेत. निरर्थकपणाचे तत्त्वज्ञान म्हणून की काय, पण कल्पित (मेक-बिलिव्ह) भंकस करणे (होल्डनचे टोपी घालून आंधळ्याप्रमाणे वावरणे, गोळी लागल्याचा अभिनय करणे तर पांडुरंगाचे सुर्शाबरोबर नऊ हजाराव्या शतकातले इतिहासकार असल्याचे समजून विसाव्या शतकाबद्दल बोलणे किंवा इचलकरंजीकर बरोबर मधुमिलिंद हे आडनाव घेऊन टाईमपास करणे इ.); वर्गातल्या मुलींचे पुढे कुणाशी लग्न होईल याबद्दलचे ‘करूण’ (ज्यांना होल्डन डिप्रेसिंग) म्हणतो असे विचार मनात येणे; क्लासिक पुस्तकांबद्दल चर्चा करणे (पांडुरंगचे मेहताशी डी.एच. लॉरेन्सबद्दल, होल्डनचे डीबीशी मॉमच्या ऑफ ह्यूमन बॉन्डेजबद्दल) वगैरे.

पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे दोन्ही निवेदनांतून जाणवत राहणारे शैलीतील साम्य. वर म्हटल्याप्रमाणे, तपशीलांतील साम्यापेक्षाही शैलीतील साम्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. ‘कोसला’च्या लोकप्रियतेमागे कथानकापेक्षा शैलीचा वाटा काकणभर अधिकच असावा. दोघांचीही निवेदनाची शैली पराभवाचा स्वीकार केलेली, थोडी तुटक अशी आहे, आणि हे अधोरेखित करायला म्हणून की काय; सॅलिंजर कथनात ‘ऑर एनिथिंग, सॉर्ट ऑफ, अँड एव्हरीथिंग, दॅट किल्ड मी.’ अशा शब्दसमूहांची वरचेवर पेरणी करतो. ह्याचेच प्रतिबिंब नेमाड्यांच्या गाजलेल्या ‘वगैरे, उदाहरणार्थ आणि थोर’ मध्ये पडलेले आहे, हे कोसलाच्या वाचकांना सहज कळून येईल.

‘कॅचर इन द राय’ जिथे संपते, तिथे कोसलाचा उरलेला अर्धा प्रवास सुरू होतो; असे म्हणायला हरकत नसावी. कॅचरची मध्यवर्ती कल्पना जरी तीच असली, तरी तिचा पट कोसलाच्या तुलनेत लहान आहे. होल्डन मनोरुग्णालयातून (अथवा सॅनिटोरियममधून) गेल्या ख्रिसमसच्या काही दिवसांबद्दल सांगतो आहे, एवढाच. कोसलामध्ये याउलट पंचविशीतला सांगवीकर त्याच्या आयुष्यातील काही वर्षांविषयी सांगतो आहे. ह्या मोठ्या पटाचे फायदे आहेत, तसेच अर्थात तोटेही.

मोठा पट असल्यामुळे कोसलात काही ठिकाणी थोडा पसरटपणा येणे अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर पांडुरंगची मनःस्थिती दर्शवणारी रोजनिशी नेमाड्यांना वेगवेगळे भाषिक प्रयोग करायलाही वाव देते. ‘पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी’ सारखी वाक्यं याच भागातली. मनीच्या मृत्यूचे प्रकरण नेमाड्यांनी अतिशय जीवघेणे लिहिले आहे. ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिने एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’, यासारख्या ओळी पहिल्याच प्रयत्नात ‘कट निअरर द एकिंग नर्व्ह’चा परिणाम साधून जातात.

पण या गोष्टींबरोबरच दुसर्‍या भागात, पांडुरंगाचा संपूर्ण पराभवाकडे होणारा प्रवास दाखवताना कोसला काही ठिकाणी विस्कळीतही होते. कॅचर मात्र एखाद्या परिणामकारक शॉर्ट फिल्मसारखा नेमका परिणाम साधून उत्कर्षबिंदूवर थांबते. नायकाच्या संपूर्ण पराभवाचा, त्याच्या हतबल मानसिकतेचा संपूर्ण प्रवास दाखवण्याच्या भानगडीत ती पडत नाही. हा एक मुख्य फरक वगळला तर; अंतर्नादच्या श्रेष्ठ पुस्तके विशेषांकात संजय जोशींनी लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कोसला निर्णायकपणे पराभूतवादी तर कॅचर ढोबळमानाने आशावादी, होल्डनच्या भवितव्याबद्दलच्या सार्‍या शक्यता मोकळ्या ठेवून संपली असल्याचे म्हटले आहे, ते तितकेसे पटत नाही. होल्डन सॅनिटोरियममध्ये असल्याचे कादंबरीच्या सुरुवातीला आणि शेवटी पुरेसे स्पष्ट केले आहेच. उलटपक्षी अखेरीस पांडुरंग 'उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राह्यलेलं बरं' ह्या तडजोडवादी वृत्तीचा स्वीकार करताना दाखवला आहे.

अगदी गेलेल्या वर्षांबद्दल बोलताना 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच...तेव्हा गमावली ही भाषा उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही' अशीही टिप्पणी करतो. कादंबरीच्या विस्तारानंतर प्रवाहाच्या विरूद्ध पोहायची धडपड सोडून देऊन तथाकथित व्यवहारी शहाणपण अंगीकारलेला पांडुरंग सांगवीकर हा या दोन कादंबर्‍यांतला मुख्य फरक. सारांश म्हणजे, पुनरुक्तीचा आरोप पत्करून, ऑगस्ट स्ट्रिंडबर्गच्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच दु:खाची नस शोधणार्‍या दोन वेगळ्या मातींतल्या ह्या दोन असामान्य कादंबर्‍या. कोसला लिहिताना नेमाड्यांनी 'कॅचर'वरून प्रेरणा घेतली आहे, हे अमान्य करता येणार नाही. तपशीलांतील आणि त्याहूनही महत्त्वाचा म्हणजे, शैलीतील सारखेपणा वरवरच्या वाचनातही जाणवण्यासारखा आहे. पण त्याचवेळी कोसला ही कॅचरची नक्कल आहे असे म्हणणे चुकीचे, अन्याय्य ठरेल. मूळ कल्पनेत नेमाड्यांनी स्वत:च्या प्रतिभेची गुंतवणूक करून तिचा थोडा विस्तार केला आहे, हे नक्की. समीक्षकी भाषेत, त्यामुळे कॅचर अधिक 'टोकदार' ठरते आणि कोसला थोडी 'पसरट' होते असे म्हणायचे की, कोसला हे कॅचरच्या वाटेवरचे पुढचे पाऊल आहे असे ठरवायचे; हा भाग अलाहिदा (आणि व्यक्तिसापेक्षही).

1 comment:

  1. नमस्कार केतकी,

    आपला लेखांचा संग्रह करण्याचा उपक्रम चांगला आहे, पण मूळ लेख ज्याने लिहिला त्या लेखकाचे नाव, त्याच्या ब्लॉगचे नाव व पत्ता त्यासोबत जोडणे आवश्यक आहे. वरील लेख हा 'मराठी साहित्य' ह्या ब्लॉगवर लिहिला गेला होता. दुवा - http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html. कृपया तसा स्पष्ट उल्लेख येथे करावा, ही नम्र विनंती.

    कळावे,
    नंदन

    ReplyDelete